श्री साईबाबा काकड आरती

जोडूनियां कर चरणीं ठेविला माथा ।परिसावी विनंती माझी सद्गुरूनाथा ॥ १ ॥

असो नसो भाव आलों तुझिया ठाया ।कृपादृष्टीं पाहें मजकडे सद्गुरूराया ॥ २ ॥

अखंडित असावें ऐसे वाटतें पायीं ।सांडूनी संकोच ठाव थोडासा देई ॥ ३ ॥

तुका म्हणे देवा माझी वेडीवांकुडी ।नामें भवपाश हातीं आपुल्या तोडी ॥ ४ ॥

उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां ।झाला अरूणोदय सरली निद्रेची वेळा ॥ १ ॥

संत साधू मुनी अवघे झालेती गोळा ।सोडा शेजे सुखें आतां बघूं द्या मुखकमळा ॥ २ ॥

रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी ।मन उतावीळ रूप पहावया दृष्टी ॥ ३ ॥

राही रखुमाबाई तुम्हां येऊं द्या दया ।शेजे हालवूनी जागे करा देवराया ॥ ४ ॥

गरूड हनुमंत उभे पाहती वाट ।स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट ॥ ५ ॥

झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ।विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकडा ॥ ६ ॥

भेटी लागीं जीवा लागलीसे आस ।पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥ १ ॥

पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन ।तैसे माझे मन वाट पाहे ॥ २ ॥

दिवाळीच्या मुळा लेकी आसावली ।पाहतसे वाटुली पंढरीची ॥ ३ ॥

भुकेलिवा बाळ अति शोक करी ।वाट पाहे परी माऊलीची ॥ ४ ॥

तुका म्हणे मज लागलीसे भूक ।धांवुनी श्रीमुख दावीं देवा ॥ ५ ॥

उठा उठा श्रीसाईनाथ गुरू चरणकमळ दावा ।आधि व्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा ॥ धृ ॥

गेली तुम्हां सोडुनी भवतम रजनी विलासली ।किरणें अंतरीं प्रबोधिनी आनंदें दाटली ॥

बोले विहंगम मनोहर निर्गुणी गुंफावली ।करूनि दर्शन मुकापणीं प्रणिपात करिती ॥ १ ॥

जागे होऊनि आळस झडुनी निपुण करिती सेवा ।भक्तजन सारे उभे राहुनी करिती तुझी स्तुति देवा ॥ २ ॥

काकड आरती करितो साईनाथ देवा ।चिन्मय रूप दाखवी घेउनि बालक लघू सेवा ॥ धृ ॥

काम क्रोध मद मत्सर आटूनि काकडा केला ।वैराग्याचे तूप घालूनि मी तो भिजविला ॥

साईनाथ गुरू भक्ती ज्वलने तो मी पेटविला ।तद्वृत्ती जाळुनि गुरूने प्रकाश पाडिला ॥ १ ॥

द्वैत तमा नासूनि मिळवी तत्स्वरूपीं जीवा ।चिन्मय रूप दाखवी घेउनि बालक लघू सेवा ॥ २ ॥

भू भूवः स्वः स्वर्ग लोक अताळीं पाताळीं ।व्यापुनि राहिलासी स्वामी तूं भक्तांनुकूळीं ॥

ऐसे तुझें रूप गुरूराया दृष्टीसी ना मिळे ।म्हणूनि काकड आरती करूनी पाहतो तुज डोळे ॥ ३ ॥

साईनाथ गुरू माझी आई ।मजला ठाव द्यावा पायीं ॥ धृ ॥

दत्तराज गुरू माझी आई ।मजला ठाव द्यावा पायीं ॥

श्रीसच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय ॥

Sai Baba Kakad Aarti in Marathi — Amrit Vani